श्री गणेशाचे अवतार दोन प्रकारचे आहेत. 
एक आविर्भाव म्हणजे स्वेच्छेने प्रकट होऊन विघ्ननाशनादी आवश्य कार्य साधून लगेच अंतर्धान पावणारा, अर्थात अगदी थोडा वेळ असणारा, वक्रतुंडासारखा अवतार आणि दुसरा अवतार म्हणजे अधिक काळ राहणारा अर्थात विशिष्ट कार्यासाठीच प्रकट व्हावयाचे, पण त्या अवताराबरोबर अनेक प्रकारच्या भक्तानुग्रही लीलाही करायच्या असा मयूरेश, विनायक इत्यादी अवतार होत. अर्थात दोन्ही प्रकारच्या अवतारांमध्ये भक्तजनांचे तपश्चर्यण व कामना, संकल्प सिध्यर्थ व अभक्तजन व असुरांना शासन वगैरे कारणाकरताच श्री गणेशांनी अवतार घेतले. येथे विशेषत्वाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री गणेशाने कोठल्याही असुराचा वध केला नाही, तर त्याच्या मदाचा नाश करून त्याला आपल्या अंकित ठेवले. त्या त्या असुरामुळे समाजात बळावत चाललेल्या मदप्रवृत्तीचा नाश केला, हे खालील अवतारकार्यावरून दिसून येईल. त्या त्या असुराच्या नावावरून आपल्या उन्नतीच्या आड येणाऱ्या आपल्यातील त्या त्या मदप्रवृत्तीचा नाश करावा, अशी अप्रत्यक्ष रीतीने श्री गणेशांनी आपणास शिकवण दिली, हे आपण लक्षात ठेवावयास हवे.
अवतार :
१. वक्रतुंड, 
२. एकदंत, 
३. गजानन,
४. लंबोदर, 
५. विकट, 
६. विघ्नराज,
७. महोदर, 
८. धूम्रवर्ण

कार्य :

मत्सरासुराचा नाश ’ 
मदासुराचा नाश
लोभासुराचा नाश 
क्रोधासुराचा नाश
कामासुराचा नाश 
दंभासुराचा नाश
मोहासुराचा नाश 
अहं असुराचा नाश.

शिकवण :

आपल्यातील मत्सराचा नाश करणे.
आपल्यातील मदाचा नाश करणे.
आपल्यातील लोभाचा नाश करणे.
आपल्यातील क्रोधाचा नाश करणे.
आपल्यातील कामवृत्तीचा नाश करणे.
आपल्यातील दंभाचा नाश करणे.
आपल्यातील मोहाचा नाश करणे.
आपल्यातील अहंपणाचा नाश करणे.

वरील अवताराखेरीज श्री गणेशांनी अनेक अवतार घेतले. ज्ञानारी आणि शुभ्रसेन राजा यांचे अनुक्रमे सुबोध आणि नरकेसरी हे दोन गणेशभक्त पुत्र होते, पण ज्ञानारी आणि शुभ्रसेन हे दोघे गणेशद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही गणेशभक्त मुलांचा अत्यंत छळ केला. श्री गणेशांनी अवतार घेऊन आपल्या बालभक्ताचे तसेच दुसरा एक बालभक्त बल्लाळ या सर्व बालभक्तांचे संरक्षण करून त्यांच्या पित्यांना शासन केल्याचा पुराणात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता व असुरांचा नाश करण्यासाठी कारणपरत्वे श्री गणेशांनी इतरही अनेक अवतार धारण केल्याचे पुराण दाखले आहेत.

दुसऱ्या प्रकारच्या अवतारामध्ये श्री गणेशांनी -

१. विनायकनामक अवतार घेऊन नरान्तक व देवान्तक यांचा नाश केला.
२. मयूरेशनामक अवतार घेऊन सिंधुसुराचा नाश केला.
३. श्री गणेशनामक अवतार घेऊन सिंदुरासुराचा नाश केला.
४. कपिलनामक अवतार घेऊन कमलासुराचा नाश केला.
५. वरदमूर्तीनामक अवतार घेऊन तामिस्रासुराचा नाश केला.
६. धूम्रकेतूनामक अवतार घेऊन धुमासुराचा नाश केला.

अशा प्रकारे अनेक अवतार घेऊन असुरांपासून लोकांचे रक्षण केले. सूर आणि असुर हे पौराणिक अलंकारिक शब्द असून सूर याचा अर्थ संवादी म्हणजे आत्मतत्त्वाशी निगडित असलेले व स्वानंदानुभव भोगणारे. असुर म्हणजे, अ म्हणजे नाही, सूर म्हणजे योग्य जे आत्मानुभवाच्या आनंदाच्या आड येणारे ते, म्हणजे कामासुर, मोहासुर इत्यादी. आपले षड्विकार हे आपल्या आनंदाच्या आड का येतात याचा विचार करता ज्या वेळेला या गुणांमध्ये मद उत्पन्न होतो तोच मद आत्मानंद नाश करणारा आहे. म्हणजे मदरहित हे गुण मानवजातीला अनुकूल आहेत. म्हणून त्यांचा नाश न करता त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या मदाचा नाश करणे हाच असुर विनाश होय. त्याच्याकरिता जी स्थिर बुद्धी ती बुद्धिदाता गणेश अथवा गणपती होय.

साभार : लोकप्रभा 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top