महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. त्यात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावतामाळी अश्या अनेक संतांचा समावेश आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये , विचार, आचार , चांगुलपणा , सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणी मुळेच .
संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी  " उर्फ " भावार्थ दीपिका "या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या  शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे "पसायदान " मागितले .
ते पसायदान आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न. 

  


आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वांग्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले  . 


जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । 
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।
या पसायदानात ते मागतात कि जे  वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे .  


दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।

वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.


वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।

सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी  यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे . 


चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

त्या संतांच वर्णन ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत .

 

चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत व  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .


किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।

या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें ।
दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी ।।

आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय विजय मिळवून सुखी व्हावे . 


तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।

त्यावर विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला , व ज्ञानेश्वर आनंदी झाले .

तर मित्रांनो हा मूळ पसायदानाचा शब्दशः अर्थ नसून सोप्या भाषेतला अर्थ आहे . ज्ञानेश्वरांनी आपल्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे .
हा अर्थ तुम्हाला आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय ज्ञानेश्वर चरणी अर्पण , व यात काही चुका असल्यास त्या मात्र निशंशय माझ्या !


लेखिका : प्रतिक्षा गायकर ( बदलापूर )

तू असतानाच वेड …
अन् नसताना चाहूल
जणू आठवणधारांनी ओलचिंब होणं,
तू नसतोस तो विरहाचा क्षण
म्हणजे मुसळधार पावसात
भिजल्याशिवाय राहणं.. . . . . . . .
खिडकीत उभी राहून
जेव्हा मी तुला बाहेर बघते,
मनातल्या मनात मीच
सर होउन बरसत असते.
तुझ्या सरिंमधे विरघळण्यासाठीच
कदाचित माझा जन्म झाला असावा,
अन् मला भिजवण्यासाठीच
तुझा थेंब थेंब बनला असावा.
इतक कस रे आपल नातं
नाजुक सुद्धा अन् खंबीर तितकच,
माझ माझ्यात असणं
म्हणजे गुंतून जाणं तुझ्यात इतकच

- कवयित्री : प्रतीक्षा गायकर ,बदलापूर

 इतक करशील का ?

भिजवना्रया पावसात
मोहरवनारी मीठी घेउन भेटशील का?.

भिजलेल्या कळीचं
तुझ्या ओलेत्या ओठांनी चुंबन घेशील का?.

पावसात भिजायला
मी नको म्हणताना हाताला धरुन नेशील का?.

तुझ्या मनातल गुज
या पावसाळ्यात तरी ओठांवर आणशील का??

कवयित्री : प्रतीक्षा गायकर ,बदलापूरकातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.


मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.


जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.


मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......


तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.


पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.


ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.


तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.
नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.


पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....


रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.


आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो


ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.


अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.... ;) <3


 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?" 


"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ." 

"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला  स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"


"मी  थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"
"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी?"


"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस."


"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना  खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."
"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."


"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य  होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"


"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे  आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"

 
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ  होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा  पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो  भानावर आला आणि म्हणाला,"अरे आपले  आयुष्य  पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
 

एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".
 
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी